श्री हनुमान स्तुती मराठी: महारुद्र अवतार हा सूर्यवंशी (Shri Hanuman Stuti Marathi)
श्री हनुमान स्तुती (मराठी)
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी।
अनादिनाथ पूर्ण तारावयासी॥
असा चैत्र पौर्णिमेचा जन्म झाला।
नमस्कार माझा तया मारुतीला॥१॥
तनु शिवशक्ती असे पूर्वजांचे।
किती भाग्य वर्णू तया अंजनीचे॥
तिच्या भक्तिलागी असा जन्म झाला।
नमस्कार माझा तया मारुतीला॥२॥
गिळायासी जाता तया भास्करासी।
तिथे राहु तो येउनी त्याजपासी॥
तया चंडकीर्णा मारिता तो पळाला।
नमस्कार माझा तया मारुतीला॥३॥
खरा ब्रह्मचारी मनाते विचारी।
म्हणोनी तया भेटला रावणारी॥
दयासागरू भक्तीने गौरविला।
नमस्कार माझा तया मारुतीला॥४॥
सुमित्रासुता लागली शक्ती जेंव्हा।
धरी रूप अक्राळविक्राळ तेंव्हा॥
गिरी आणुनी शीघ्र तो उठविला।
नमस्कार माझा तया मारुतीला॥५॥
जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी।
समस्तांपुढे तापसी निर्विकारी॥
नमू जावया लागी रे मोक्षपंथा।
नमस्कार माझा तुम्हा हनुमंता॥६॥